गीता श्लोक ७-८
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ १-७ ॥
भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १-८ ॥
अर्थ-“हे ब्राह्मण श्रेष्ठ! आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते
जाणून घ्या. माझ्या सैन्यातील जे महत्वाचे सेनापती आहेत. ते आपल्या माहितीसाठी मी आपणाला
सांगत आहे. (७) आपण (द्रोणाचार्य), पितामह भीष्म, कर्ण, युद्धात सहभागी होणारे कृपाचार्य,
अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा (८).
द्रोणाचार्य- भारद्वाज ऋषी व घृतार्ची अप्सरेचे पुत्र. भगवान परशुरामाचे
शिष्य. अश्वत्थामाचे पिता. कौरव सेनेचे सेनापती. कौरव-पांडवांचे गुरु.
भीष्म- गंगा व शंतनू राजाचे पुत्र. कौरव-पांडवांचे आजोबा. युद्धात
मात्र कौरव पक्षातून लढत होते. यांना इच्छामरणाचे वरदान प्राप्त होते. हे अष्ट वसुंपैकी
एक.
कर्ण – दुर्वास ऋषींनी राजकन्या कुंतीने केलेल्या सेवेने प्रसन्न
होऊन तिला प्रसाद म्हणून मंत्र दिला. त्या मंत्राचा पडताळा पाहण्याच्या उत्साहात सूर्यनारायणाच्या
प्रसादाने जो पुत्र जन्माला तोच हा कर्ण. तो कुंतीच्या विवाहाआधी झाला असल्याने त्याचा
त्याग केला. भीष्म व द्रोणांनी दुर्योधनाला अट घातलेली असते. आम्ही असे पर्यंत कर्ण
युद्धात भाग घेणार नाही. जन्मतः हा कवच कुंडलांसह जन्मलेला! भीष्मांना याच्या जन्माचे
रहस्य ज्ञात होते.
कृप – म्हणजेच कृपाचार्य . हे देखील धनुर्विद्येत निपुण होते. तसेच
कौरव-पांडवांचे आचार्य होते. लहानपणापासून ते हस्तिनापूरच्या राजवाड्यात वाढले. त्यांची
बहिण कृपी व कृपाचार्य यांचे आई-वडील म्हणजे मुनी शरद्वत व अप्सरा जनपदी मुनी तपश्चर्येला
व अप्सरा स्वर्गात निघून गेल्याने ही मुले वनांत एका सेवकाला मिळाली. त्यांना त्याने
राजदरबारात आणले. राजा शंतनुने त्यांची राजवाड्यातच व्यवस्था केली. हे सप्तचिरंजीवांपैकी
एक.
अश्वत्थामा – द्रोणाचार्य व कृपी यांचा पुत्र. कृपाचार्यांचा भाचा.
जन्मतः याच्या कपाळावर नीलमणी होता. सप्त चिरंजीवांपैकी एक. ब्रह्मास्त्रांच्या दुरुपयोगाची
शिक्षा म्हणून याला चिरंजीवीत्व प्राप्त.
विकर्ण – दुर्योधनाचा भाऊ. महापराक्रमी व न्यायी. द्रौपदी वस्त्रहरणाच्या
प्रसंगी विदुरासह यानेही या पापकृत्याचा निषेध नोंदवला. पुढे युद्धात भीमाने याचा वध
केला त्याचे भीमाला अपार दुःख झाले.
सोमदत्ती – सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा ज्याचे नाव वर गीतेच्या ८
व्या श्लोकात आणि ज्ञानेश्वरीच्या १०८ व्या ओवीत “सोमदत्ती” म्हणून उल्लेखिले
आहे.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।